Written by 8:06 pm Featured

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील महत्वाच्या तरतुदी

रजेची सर्वसाधारण तत्वे

1. रजा हक्क म्हणून मागता येत नाही (नियम 10)

2. रजा मंजूर करणारा सक्षम अधिकारी प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारु शकतो किंवा रद्द करु शकतो.  (नियम 10)

3. रजा मंजूर करणा-या प्राधिका-यास कर्मचा-याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही. त्यासाठी कर्मचा-याची लेखी विनंती असली पाहिजे.  (नियम 10)


4कर्मचारी सेवेत असताना त्याच्या विनंतीवरुन भूतलक्षी प्रभावाने एका प्रकारच्या रजेचे दुस-या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते. मात्र त्यावेळी तशी रजा अनुज्ञेय असली पाहिजे. रजेच्या परिवर्तनामुळे जादा देण्यात आलेल्या रकमेची वसुली केली जाते किंवा थकबाकीची रक्कम दिली जाते. (नियम 4)


5. अनुपस्थितीचा कालावधी भुतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तीत करता येतो. अशा प्रकारची रजा ही उपभोगण्यापुर्वी अर्ज करुन मंजूर करुन घेतली जात नाही. अनुपस्थिती नियमित करण्यासाठी ही रजा नंतर मंजूर केली जाते. (नियम 63(6))


6. कोणत्याही प्रकारची रजा सतत 5 वर्षाहून अधिक कालावधीकरीता मंजूर करता येत नाही. पुर्वी 5 वर्षे अनुपस्थित राहिल्यास नोकरी गमवावी लागत होती (BCSR) पण आता सलग रजा मंजुरीस प्रतिबंध  नियम 16


7. रजेच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय सक्षम प्राधिका-याच्या पूर्व मंजुरीशवाय स्वीकारता येत नाही. 24 तास सरकारी नोकर हे तत्व या मागे असल्याने अशी परवानगी सहसा मिळत नाही. (नियम 16)


8. राजपत्रित कर्मचा-यास शासकीय वैदयकीय अधिका-याच्या वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैदयकीय कारणास्तव रजा मंजुर करता येते. अराजपत्रित कर्मचा-यांना नोंदणीकृत वैदयक व्यवसायीच्या वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैदयकीय रजा मंजुर करता येते. (नियम  40)


9. रजा मंजुर करणा-या सक्षम प्राधिका-याला स्वेच्छा निर्णयानुसार दुसरे वैदयकीय मत घेता येते. सामान्यत: रजेचा अर्ज आल्याबरोबर म्हणजे रजा चालू असताना ही कार्यवाही अपेक्षित. कर्मचारी परत हजर होताना ही कार्यवाही केली जाते व ती निरुपयोगी ठरते. (नियम  41)


10. वैदयकीय कारणास्तव रजेवर असलेल्या कर्मचा-याने वैदयकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याला कामावर घेता येत नाही. (नियम  47)


11. रजा संपल्यानंतर कामावर अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही (नियम  48)


12. रजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस या दरम्यानचा संपूर्ण कालावधी (रविवार व सुट्टया धरुन) अनुपस्थितीचा काळ म्हणून धरण्यात येते. (नियम  49)


13. रजेच्या मागे किंवा पुढे जर सार्वजनिक सुट्टया असतील तर त्या जोडून घेता येतील. कार्यालयीन कामकाज करणा-यांना ही सवलत मिळते पण Field मध्ये जर पर्यायी कर्मचारी उपलब्ध असेल तरच हा लाभ मिळेल.


14. राजीनाम्यामुळे कर्मचा-याच्या शिल्लक रजेवरील हक्क सामान्यत: संपतो. परंतु सरकारी कर्मचा-याने आपल्या पदाचा राजीनामा देवून शासनाच्या अन्य विभागास नामनिर्देशनाने नेमणूक स्वीकारल्यास तो राजीनामा तांत्रिक दृष्टया त्या पदाचा समजावा. शासकीय सेवेचा नाही त्यामुळे राजीनाम्याच्या दिवशी शिल्लक असलेली सर्व रजा नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हिशोबात घेण्यात यावी. (नियम 22)
रजेचे प्रकार

देय व अनुज्ञेय रजा
1) अर्जित रजा – नियम 50 व 51
2) अर्धवेतनी रजा – नियम 60
3) परीवर्तीत रजा – नियम 61
4) अनर्जित रजा  – नियम 62
5) असाधारण रजा – नियम 63

विशेष रजा
1) प्रसूति / गर्भपात रजा – नियम 74
2) विशेष विकलांगता रजा – नियम 75
     (हेतुपुरस्कर झालेल्या इजेबद्दल)
3) विशेष विकलांगता रजा – नियम 76
     (अपघाती इजेबद्दल
4) रुग्णालयीन रजा – नियम 77
5) खलाशांची रजा – नियम 78
6) क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग /   
   पक्षघात रजा – नियम 79 व परिशिष्ट -3
7) अध्ययन रजा नियम

(टीप : अनु क्र. 3 व 4 हे ही अर्धवेतनी रजेचाच उप प्रकार आहे.)


देय व अनुज्ञेय रजेची  वैशिष्टये

(1) अर्जित रजा – नियम 50
1. प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 1 तारखेस‍ प्रत्येकी 15 दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा जमा केली जाते.

2. ही रजा 300 दिवसांच्या कमाल मर्यादेपर्यंत साठविता येते. 300 दिवस झाल्यावर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला 15 दिवस अनुज्ञेय असतात पण, 300 + 15 असे दाखवावे व घेतलेली रजा प्रथम 15 दिवसातुन वजा करावी च 300 पेक्षा जास्त शिल्लक राहिलले दिवस व्यपगत होतील. मात्र एकाच वेळी सलग 180 दिवसापर्यंत ही रजा मंजुर करता येते.

3. प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याना अडीच दिवस दराने ही रजा जमा केली जाते.


4. सेवेचा कॅलेडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.


5. असाधारण रजा / अकार्य दिन /  निलंबन या कालावधी साठी 1/10 या दराने ही रजा कमी केली जाते. मात्र 15 दिवसापेक्षा जास्त कपात करता येणार नाही.


6. रजेचे दिवस अपूर्णांकात असल्यास ते पुढील दिवसांशी पूर्णांकात केले जातात.


7. शक्यतोवर‍ परिशिष्ट – 5 मधील नमुना – 1 मध्ये या रजेसाठी अर्ज करावयाचा असतो.


8. रजा वेतन :- रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या   दराने वेतन आहरित केलं त्याच दराने सुंपूर्ण रजा काळात “रजा वेतन” मिळेल. वेतनवाढ जरी रजा काळात आली तर वेतनवाढ मिळते परंतु प्रत्यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्यावर मिळेल.

(2) अर्धवेतनी रजा
1. प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 1 तारखेस‍ प्रत्येकी 10 दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येते.

2. ही रजा पूर्ण कॅलेंडर महिन्याना 5/3 या दराने जमा करण्यात येते.

3. कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.

4. अकार्य दिनाच्या कालावधीसाठी ही रजा 1/18 या दराने कमी केली जाते.

5. रजेचे दिवस अपूर्णांकात येत असल्यास ते नजीकच्या दिवसांत  पूर्णांकित केले जातात.

6. ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते.

7. या रजेच्या साठवणुकीवर मर्यादा नाही.

8. या रजेसाठी विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असतो. (परिशिष्ट -5 नमुना -1)

9. रजा वेतन :- या काळात रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन आहरित केलं त्याच दराच्या 50% वेतन व त्यावर आधारित महागाई भत्ता मिळतो मात्र, घरभाडे भत्ता व शहर पुरक भत्ता मागील महिन्याच्या दराने अनुज्ञेय.

(3) परिवर्तीत रजा – नियम 61

ही रजा वैदयकीय प्रमाणपत्रावर खालील अटींच्या अधीन राहून मंजूर केली जाते.

1. कर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणा-या अधिका-याची खात्री पटली पाहिजे.


2. पूर्णवेतनी रजेच्या स्वरूपात मंजूर केली जाते.

3. दुप्पट दिवस अर्धवेतनी रजेच्या खाती टाकले जातात.

4. कर्मचारी सेवेत परत न आल्यास या रजेचे रुपांतर अर्धवेतनी रजेत केले जाते व अति प्रदानाची रक्कम वसूल करण्यात येते.

5. रजा वेतन :- अर्जित रजेवर गेल्यावर मिळते   

   त्याचदराने म्हणजे पूर्ण दराने रजा वेतन अनुज्ञेय 

अपवाद – खालील प्रकरणी ही रजा मंजूर करण्यासाठी  वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.

1. प्रसुती रजेला जोडून 60 दिवसांच्या मर्यादेपर्यंत बालसंगोपनासाठी.


2. लोकहितास्तव उच्च अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 90 दिवसांपर्यंत.

3. विपश्चनेसाठी 14 दिवसांपर्यत, तीन वर्षातून एकदा / संपूर्ण सेवेत  6 वेळा 

4. शिक्षक संवर्गासाठी  प्रत्येक सहामाहित त्यांना अनुज्ञेय 10 दिवस  अर्धवेतनी
     रजेएवढी 5 दिवस पूर्ण वेतनी रजा शासन निर्णय दि. 6/12/96 प्रमाणे घेता
     येईल. मात्र या रजेस अर्जित रजा असे संबोधले आहे.
(4) अनर्जित रजा – नियम 62

1. कोणतीच रजा शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करता येते. म्हणजेच हा रजचा over draft आहे.


2. ही रजा अर्धवेतनी स्वरुपात मंजूर करता येते.

3. संपूर्ण सेवेच्या कालावधीत 360 दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.

4. एकावेळी वैदयकीय प्रमाणपत्राखेरीज 90 दिवसांपर्यंत व वैदयकीय प्रमाणपत्र धरून जास्तीत जास्त 180 दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.

5. ही रजा मंजूर केल्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होते त्या रजे मधून अनर्जित रजा वजा करता येते.

6. ही रजा मंजूर केल्यानंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसुली केली जाते.

7. ही रजा फक्त सेवेत कायम असलेल्या कर्मचा-यांनाच मंजूर करता येते.

8. रजा वेतन :- अर्धवेतनी रजेप्रमाणे रजा वेतन या रजेत मिळते.
(5) असाधारण रजा – नियम 63

1. कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल किंवा असताना देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली तरच ती रजा मंजूर करता येते.

2. कायम सेवेतील कर्मचा-याला कोणत्याही प्रकारची रजा 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत नाही.

3. अस्थाई कर्मचा-यांना ही रजा खालील मर्यादेर्यंत मंजूर करता येते.

4. कोणताही कर्मचारी – वैदयकीय प्रमाणपत्राशिवाय  – 3 महिन्यांपर्यंत.

5. तीन वर्षाच्या सेवेनंतर -वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे 6 महिन्यांपर्यंत.

6. पाच वर्षाच्या सेवेनंतर – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे 12 महिन्यांपर्यंत.

7. एक वर्षाच्या सेवेनंतर – कर्करोग, मानसिक रोग यासाठी  – 12 महिन्यांपर्यंत.

8. एक वर्षाच्या सेवेनंतर  –  क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी – 18 महिन्यांपर्यंत.

9. तीन वर्षाच्या सेवेनंतर  –  लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी  – 24 महिन्यांपर्यंत.

10. रजा वेतन :-या रजमध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता ते मात्र घरभाडयावर त्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतोय असे प्रमाणपत्र सक्षम अधिका-यांना देणे गरजेचे आहे. शा. नि. दि. 4/9/2000. याबाबतची खात्री सक्षम अधिका-याने करणे गरजेचे असून त्यांचे समाधान झाल्यावर सदर फायदा देता येईल.

विशेष रजेची वैशिष्टये

(1) प्रसुती रजा / गर्भपात रजा – नियम 74

1. महिला शासकीय कर्मचा-यांना प्रसुती रजा खालीलप्रमाणे अनुज्ञेय ठरते.


2. पुर्वशर्त :- दोनपेक्षा कमी हयात मुले असावीत.

3. महिला कर्मचा-यांना 180 दिवस. पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात.

4. शासन निर्णय दि. 15/1/2016 अन्वये स्थायी /अस्थायी महिला कर्मचा-यांना पुर्ण वेतन अनुज्ञेय.

5.अस्थायी महिला कर्मचा-यांकडून सेवा समाप्तीनंतर दोन वर्षे सेवा करण्याची हमीपत्र लिहून घ्यावे.

6. याशिवाय शा. नि. 28/7/1995 प्रमाणे या रजेस बालसंगोपनासाठी 60 दिवसांची परावर्तीत रजा व अनर्जित रजा किंवा अनुज्ञेय रजा धरुन 1 वर्षापर्यंत मंजूर करता येईल.

7.विकलांग अपत्य असल्यास महिला कर्मचारी व पत्नी नसलेले पुरुष कर्मचारी हयांना संपुर्ण सेवेत 730 दिवस विशेष रजा अनुज्ञेय (शा. नि. 21/9/2016)

गर्भस्त्राव / गर्भपात

1. प्रसुती रजेच्या वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून संपूर्ण सेवेच्या कालावधीत 45 दिवस. परंतु दोन पेक्षा कमी हयात अपत्ये ही अट यासाठी लागू नाही.

2. दत्तक मुलांसाठी विशेष रजा शा. नि. वित्त विभाग क्रमांक अरजा/2495/26/सेवा 9 दिनांक 26/10/1998.

3. मुल 1 वर्षाचे आत असल्यास 180 दिवस.

4. मुल 1 वर्षाचे पुढे असल्यास 90 दिवस.

5. स्वत:चे एक अपत्य असतानाही घेता येईल.

6. या रजेस जोडून बाल संगोपन अअ (E L सुद्धा) घेता येईल. शा. नि. वि. वि. 15/3/2017.
(2) विशेष विकलांगता रजा

(अ) हेतूपुरस्पर झालेल्या इजेबद्दल – नियम 75

1.पदाच्या कर्तव्याचे योग्य पालन करीत असताना त्याच्या परिणाम किंवा हेतुपुरस्पर झालेली इजा.


2. विकलांगता घटना उदभवल्यापासून तीन महिन्याच्या आत उघड होणे आवश्यक.

3. तथापि सक्षम प्राधिका-याची खात्री पटल्यास झालेला विलंब क्षमापित करता येतो.

4. रजा कोणत्याही एका विकलांगतेच्या परिणामी 24 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये.

रजा वेतन –

1. पहिल्या 120 दिवसांसाठी – अर्जित रजा वेतनाइतकी


2. उरलेल्या कालावधीसाठी – अर्धवेतनी रजेइतकी.

3. स्वेच्छेनुसार कर्मचारी आणखी जास्तीत जास्त 120 दिवसांच्या कालावधीसाठी अर्जित रजा वेतन घेऊ शकतो. अशावेळी रजा अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची

3) रुग्णालयीन रजा – नियम 77

वर्ग – 4 चे कर्मचारी व यंत्रसामुग्री, स्फोटके द्रव्ये, विषारी औषधे हाताळणारे वर्ग -3 चे कर्मचारी यांनाच फक्त अनुज्ञेय असते.

पदाची कर्तव्ये पार पाडत असताना

रजेचा कालावधी जास्तीत जास्त 28 महिने

रजा वेतन –

पहिल्या 120 दिवसांसाठी – अर्जित रजा वेतनाएवढी


उरलेल्या कालावधीसाठी – अर्धवेतनी रजा वेतनाएवढी

4) क्षयरोग/कर्करोग/कुष्ठरोग/पक्षघात रजा – नियम 79 व परिशिष्ट -3

1. ही रजा मंजूर करण्यासंबंधीचे नियम 


2.  परिशिष्ट -3मध्ये नमूद करण्यात आले आहेत.

नियम – 1- व्याप्ती

रोजंदारी /अंशकालीन कर्मचारी वगळून सर्व कर्मचा-यांना लागू आहेत.

स्थायी – सर्व सवलती अनूज्ञेय

अस्थायी – तीन वर्षाची सेवा – सवलती अनुज्ञेय

1. 1 ते 3 वर्ष सेवा – आर्थिक व पूर्ण वेतनी क्षयरोग रजा सोडून इतर सवलती.

2. एक वर्षापेक्षा कमी सेवा – कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही. (शासकीय इस्पितळातील मोफत उपचार सोडून)

3. निलंबनाधीन कर्मचा-यास वरीलप्रमाणे अनुज्ञेय.

4. रजेसाठी तपासणी – मु्ंबई  -जी.टी./जे .जे. रुग्णालय

5. अन्यत्र महाराष्ट्रात – जिल्हा शल्य चिकित्सालय किंवा नजीकचे शासकीय रुग्णालय.

6. तपसणी खर्च आकारला जात नाही.

7. प्रथम खात्यावर शिल्लक असलेली अर्जित रजा. तद्नंतर एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत क्षयरोग रजा – तद्नंतर  वैदयकीय सल्ल्यानुसार असाधारण रजा. सर्व प्रकारच्या रजांच्या कालावधीची मर्यादा तीन वर्ष.

8. सक्षम प्राधिकारी – प्रादेशिक‍ अधिकारी / विभाग प्रमुख

9. रजेवर असताना उपचार – शासकीय / खाजगी वैदयकीय अधिकार

10. कामावर रुजू होण्यासाठी वैदयकीय तपासणी – वैदयकीय मंडळाचे प्रमाणपत्र

11. आर्थिक सवलत – विशेष आहार खर्च, विशेष औषधांचा खर्च, आरोग्यधामाचा खर्च

12. दुस-या /तिस-या वेळी सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी –

13. विभागप्रमुख – दुस-यांदा

14.शासन – तिस-यांदा

15. पुनर्नियुक्ती – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती प्राधिकारी पुनर्नियुक्ती देऊ शकतात. प्रथम नियुक्तीच्या वेळी वैदयकीय तपासणी झाली असल्यास पुनर्नियुक्तीच्या वेळी वैदयकीय तपासणीची आवश्यकता नसते.पूर्वीच्या सेवा व वेतन संरक्षित केले आहे.

क्षयरोग रजा मंजूरी

1. कर्करोग / कुष्ठरोग/पक्षाघात झालेल्या शासकीय कर्मचा-यांना क्षयरोग सवलती लागू आहेत. तसेच शा. नि. दि. 20/01/2005 प्रमाणे एड्सग्रस्तांनाही सदर सवलत अनुज्ञेय केली आहे परंतु एचआयव्ही पॉझिटिव्ह यांना मात्र अनुज्ञेय नाही.

2. क्षयरोग सवलती तीन हयात मुलांएवढे मर्यादेत असलेल्या कुटुंबाच्या कर्मचा-यास अनुज्ञेय ठरतात. दि. 20/3/2005 पासून शासनाने छोटया कुटुंबाची मर्यादा दोन हयात अपत्यांची संख्या विहित केली असल्याने या तारखेनंतर तिसरे अपत्य कुटुंबात वाढल्यास अशा कुटुंबातील कर्मचा-यास सदर सवलत मिळणार नाही.

सेवानिवृत्त सवलती बंद होतात.

रजा वेतन :- 

अर्जित रजेप्रमाणे या रजा काळात पुर्ण दराने वेतन अनुज्ञेय.

अध्ययन रजा

1. कर्तव्यक्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठयक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी

2. कमीत कमी पाच वर्षाची सेवा

3. रजा संपल्यावर कामावर परत येणे आवश्यक –कमीत कमी 3 वर्षे सेवा करणे गरजेचे आहे.

4. हक्क म्हणून मागता येत नाही.

5. एकाच व्यक्तीला वारंवार मंजूर करता येत नाही.

6. भारताबाहेरील अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नसल्याने सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.

7. अभ्यासक्रम/प्रशिक्षण लाकहिताच्या दृष्टीने निश्चित लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.

8. रजा कालावधी 12 ते 24 महिने.

किरकोळ रजा

1. रजेचा प्रकार नाही. पूर्व परवानगी आवश्यक.

2. कर्तव्य काळातून दिलेली तात्पुरती सूट.

3. वर्षाच्या 8 दिवस अनुज्ञेय.

4. सार्वजनिक सुट्टीस जोडून / अधेमधे घेता येईल.

5. सार्वजनिक सुट्टीस जोडून सलग 7 दिवसांपेक्षा जास्त काळ घेता येत नाही.

6. सेवा पुस्तकात नोंद नाही / स्वतंत्र नोंदवहीत हिशोब ठेवणे.

शासन निर्णय वित्त्त विभाग –

1. एलव्हिइ 1482 सीआर 90/एसईआर 9 दि. 24/3/1982 2. ने.मि.र./प्र.क्र.52/98 सेवा – 9 दि. 21/12/1998.

मोबदला सुट्टी

1. निम्नश्रेणी कर्मचा-यांनी सार्वजनिक सुट्टी मध्ये केलेल्या कामाचा मोबदला सुट्टी.

2. एका कॅलेंडर वर्षात एका वेळी तीन पेक्षा जास्त साठवता येत नाही.

3. पुढील कॅलेंडर वर्षात उपयोगात आणता येणार नाही.

4. जादा कामाचा आर्थिक फायदा दिल्यास मोबदला सुट्टी अनुज्ञेय नाही.

शा. नि. साप्रवि/क्र.पी 13/1397/वी/दि.16/7/64
(Visited 1,744 times, 1 visits today)
Close